उंबर

आज फिरुनी एकदा, परतलो गावात माझ्या

आजही होते उभे ते, उंबर परसात माझ्या

 

कोंब नवीन परंतु, त्याच मातीत काळ्या

वाहतो कैफ जिचा, आजही नसात माझ्या

 

वाडा उभा आजही, त्या बुलंद चिरांचा

भिनतो कंप ज्याचा, आजही उरात माझ्या

 

वेस खडी दिमाखात, गावाची परिसीमा

याव्या खुणा जिच्या, आजही वृत्तीत माझ्या

 

सोडले काल रान हे, सावलीचा शोध घेता

उभे तसेच, लावूनी डोळे परतीस माझ्या

 

- गिरीश घाटे