मी होतो कुठे

संध्याकाळी एकटाच बसलो असता,

अचानक भुतकाळाशी भेट झाली

नमस्कार चमत्कार करता करता,

शिळोप्याच्या गप्पांना सुरुवात झाली

 

निभावला छान संसार,म्हणालो त्याला,

नाही काही राहिलं करायला बघ आता

त्यावर,एकदा हिशोब कर म्हणतो मला,

मागे वळून पहा स्वतःला जाता जाता

 

आई बाबा म्हणाले होते कधी,

किती धावपळ? असतोस तरी तू कुठे?

भेट नाही, बोलणं होतं मात्र कधी,

काळजी नको, आम्हा कमी आहे कुठे?

 

हीनं बिनतक्रार साथ दिली खरी,

लपली नाही नाराजी तिची कुठे

पराकाष्ठा दोघांनीही केली खरी,

पण तिचा विचार कधी झाला कुठे?

 

मुलांसोबत बसण्याची वेळ झाली

पण त्यांना आता उसंत होती कुठे

नकळत ती छोटी पाऊले मोठी झाली,

छोटे छोटे ते क्षण टिपाया मी होतो कुठे?

 

- गिरीश घाटे