बालपण
आज पहाटे स्वप्नामध्ये,
अल्लड बालक, मजला दिसला
कोण अससी, पुसता त्याला
ओठ दाबुनी, नुसता हसला
बालपणीची, तुझीच प्रतिमा
म्हणे कसा तू, विसरे मजला?
गेला विसरून, अमूल्य साठा
देइन म्हणतो, तुझाच तुजला
पोतडी त्याने, उलटी करता
हा खेळण्यांचा, सडाच पडला
विट्टी, दांडू, गोटया, बिल्ले
मोरपिस अन् , पतंग दिसला
अकल्पीत असे, पाहुन सारे
आठवणींचा, डोंबचि उठला
भानावर मग, येऊन नंतर
प्रश्न तयाला, मीच मांडला
बालपणी मज, नव्हती चिंता
दे अल्लड वृत्ती, परतचि मजला
नाही मागे उरतचि असले
अल्लड बालक, मध्येच हसला
होते तुझेच ते, आले तुझ्यासवें
शोध तुझ्यातच, मिळेल तुजला
- गिरीश घाटे