दहावे गाढव
मध्यंतरी एक चित्र माझ्या हाती लागले. त्यावर नऊ गाढवांची चित्रे होती. परंतु त्यावर लिहिले होते, “चित्र उलटे पाहिल्यास दहा गाढवे दिसतील” खरं तर तुम्हालाच ‘गाढव’ बनवण्याचा तो एक गमतीशीर खेळ होता. हे सर्व पाहून स्फुरलेली ही कविता:
चित्रातली ती गाढवे, होतील नऊची दहा
चित्र जरी ते एकचि, उलटे करुनि पहा
सांगती पहा स्वजन, आण गळ्याची घेऊन
होईल हो चमत्कार, पहा एकदा करून
झाले मन ते उत्सुक, केले चित्र ते उलटे
न दिसे तरी दहावे, उलटे पुन्हा सुलटे
गेलो पहा मी मागोनी, न पाहिले खोटे खरे
केली प्रयत्नाची शर्थ, हाती तरी, न काही उरे
कोण मी अन काय मी, नाही हो कधी कळाले
चित्र करुनि उलटे, मलाच माझे कळले
- गिरीश घाटे