याद अजुनी येतेस तू
दाट त्या वेणीत गजरा, माळीला होतास तू
मोगऱ्याचा गंध येता, याद अजुनी येतेस तू
पापण्यांच्या ओलव्यास, केला काजळश्रुंगार तू
बरसणारे मेघ बघूनी, याद अजुनी येतेस तू
वाऱ्यासवे डोलणारा, पदर ठीक केलास तू
हलकीशी झुळूक येता, याद अजुनी येतेस तू
मानले स्वप्नात माझ्या, आजही दिसतेस तू
का एकट्या जागेपणी, याद अजूनी येतेस तू
आजन्म त्या सोबतीचे, वचन मला दिलेस तू
शब्द विरले ते परंतु, याद अजुनी येतेस तू
दुष्ट त्या सांजसमयी, पाठ करुनी गेलीस तू
अस्तणारा सूर्य बघुनी, याद अजुनी येतेस तू
- गिरीश घाटे