विसरून जावे हे बरे

सोडावयाचा हात होता, दिलास हात तू का बरे ?

मोडावयाचा शब्द होता, दिलास शब्द तू का बरे  ?

 

बोलणाऱ्या ओठात माझ्या, शब्द केवळ होते तुझे

व्यर्थ सगळे शब्द आता, विसरून जावे हे बरे

 

शोधणाऱ्या डोळ्यात माझ्या, चित्र केवळ होते तुझे

छळणारे ते चित्र आता,  पुसटून जावे हे बरे

 

वेड्या रे मनात माझ्या, आठवणी होत्या तुझ्या

उरलेल्या त्या आठवणी,  हरवून जाव्या हे बरे

 

- गिरीश घाटे