चतुरंग
दूध ना मिळे गवतासी पिळोनि |
धेनुसी फुटे पाझर त्यासी चरोनी ||
कसे झाले सांगे कोणी याचे मर्म |
पायजोडी विना करे काय हे कर्म ||
अर्थत, कर्म करणे मानवाच्या हातात आहे. परंतु विठ्ठलाच्या (पायजोडी) आशीर्वादाविना यश प्राप्ती शक्य नाही
जाई शिकारी चित्त छाव्यासी |
व्याघरींण जागे प्राणिधर्मासी ||
जोचि करितो चिंता सर्वभूतांची |
तीच मानावी ओळख मानवाची ||
अर्थात, स्वतःच्या प्रपंचाची काळजी करणे हा सर्व प्राणिमात्रांचा गुण आहे. परंतु त्यापुढे जाऊन समाजिक बांधिलकी राखणे हीच मानवाची ओळख आहे.
प्रपंच नेटका जोडु सुयोग्य धन |
परी उरोनी फेडू संचिताचे ऋण ||
कैचा परमार्थ जो पुत्रासी वनवास |
जगे संपूर्ण तोचि पुरुषार्थ खास ||
अर्थात, नेटका प्रपंच करणे ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु यातून पुढे येऊन समाजाचे ऋण फेडणे अपेक्षित आहे. जो या दोन्हीचा योग्य समतोल साधतो तोच संपूर्ण आयुष्य जगतो.
लखलाभ तयासी तो परधर्म |
कैची प्रत्युत्तरे अन कैचे मर्म ||
मज शरणागती समचरणाशी |
तुझे तुझपाशी माझे मजपाशी ||
अर्थात, माझी शरणागती समचरणाशी (विठ्ठलाच्या पायाशी) निश्चित आहे. भिन्न विचारांनी इतर निष्ठा ठेवणारे अनेक आहेत. त्यांच्या निष्ठेचा मला आदर आहे. त्यात कोणालाच मनःस्तापाचं कारण नाही
शिक्षणाचा रचिला प्रथम पाया |
त्यासी जोडीलि सुदृढ मन काया ||
अन्न वस्त्र निवारा स्वहिता अभंग |
जोडोनि सहभूती पूर्णत्वे चतुरंग ||
समाज शास्त्रात मानवी विकासाच्या तीन मूलभूत आधारस्तंभांचा उल्लेख केला आहे. शिक्षण, स्वास्थ्य आणि किमान राहणीमान हे ते तीन स्तंभ होत. परंतु यापुढें जाऊन 'मानवतेचा' अंगीकार केल्यावरच मानवाचा विकास पूर्ण होतो.
- गिरीश घाटे