मनोगत 

‘सांग ना समजेल का?’ हा कविता संग्रह वाचकांसमोर ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. तसं पाहता, कविता हा विषय मला नवीनच आहे. शाळा - कॉलेजात असताना बरंच मराठी कथा कादंबर्ऱ्यांचं वाचन होतं, पण कवितांपासून तसा दूरच होतो. व्यवसायात आल्यानंतर तर मराठी वाचनही कमीच झालं. वयाची साठी ओलांडल्यानंतर अचानक कवितांचा छंद लागला आणि त्याचं पर्यवसन आज या कविता संग्रहात झालं आहे.

सुरुवात कोविड लॉकडाऊनच्या दिवसांत झाली. संत वाङ्मय आणि त्यातल्यात्यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची मला पहिल्यापासून विशेष आवड होती. लॉकडाऊनमध्ये गाथा परत वाचायला घेतली. तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती आणि अध्यात्म याचा माझ्यावर पहिल्यापासूनच प्रभाव होता, परंतु यावेळेस महाराजांचं कवी म्हणून वेगळं रूप माझ्या समोर आलं. वाङ्मय या दृष्टीकोनातून मी संपूर्ण गाथा वाचून काढली. आणि यातूनच कविता कारण्याची  स्पुर्ती  मला मिळाली आणि “चतुरंग” या माझ्या पहिल्या कवितेचा जन्म झाला.

एव्हाना कविता करण्याचा छंद मला लागला आणि मी प्रयत्नपूर्वक यात शिरायचं ठरवलं. समर्थ रामदास स्वामी, बहिणाबाई यांच्या पासून सुरु करून मराठीतील अनेक कवींच्या कविता मी वाचल्या. त्यात सुरेश भट आणि शांताबाई शेळके यांचा विशेष प्रभाव माझ्या मनावर झाला. गझल प्रकार, ओव्या यांचे मला विशेष आकर्षण निर्माण झाले. हळूहळू आपल्या स्वतःच्या अशा कवितांचा जन्म झाला आणि त्यातून हा कविता संग्रह अस्तित्वात आला.

मी एक उत्स्फुर्त कवी नाही. परंतु वाङ्मयीन दृष्ट्या पूर्ण अशा कवितांची निर्मिती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आलो आहे. नवीन पिढीला रुचाव्यात यादृष्टीने कविता लहान आणि बोली भाषेतले शब्द वापरून केल्या आहेत. अर्थात, माझा संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास नाही. त्यामुळे संस्कृत प्रचुर शब्द वापरणे तसेही मला जमणाऱ्यातले नाही. ज्या काही कविता केल्या आहेत त्या वाचकाला आवडतील अशी आशा करतो.

कविता करण्यात आणि कविता संग्रह प्रकाशित करण्यात माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र, प्रकाशक यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मदतीशिवाय या पुस्तकाचे प्रकाशन शक्य नव्हते. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.

-              गिरीश घाटे